नाशिक - पावसाळा सुरू होताच दरड कोसळण्याच्या दुर्घटना समोर येत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जुन्या इमारतीही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारे नाशिक शहरातील प्राचीन काझी गढी देखील धोकादायक झाली आहे. मात्र याकडे मनपा प्रशासनाचा अद्यापही काना डोळा दिसून येत आहे. दरवर्षी प्रमाणे येथील नागरिकांना स्थलांतरांच्या नोटीस देण्यापलीकडे मनपा प्रशासन काहीच ठोस उपाययोजना करत नाही, त्यामुळे याठिकाणी देखील मोठी दुर्घटना घडण्याची भीती येथील नागरिकामधून व्यक्त केली जात आहे.
ड्रेनेज सिस्टिममुळे हा संपूर्ण परिसर भुसभुशीत झाल्याने धोका वाढला-
शहरात प्रसिद्ध असलेल्या काझी गढीची अवस्था धोकादायक झाली आहे. दरवर्षी गोदावरी नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने गढीचा मातीचा मोठा भराव वाहून जातो, हा संपूर्ण परिसर हा मातीच्या ढिगाऱ्यावर सध्या अधांतरी आहे. मात्र, येथील ड्रेनेज सिस्टिममुळे हा संपूर्ण परिसर भुसभुशीत झाला आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने मातीचा भराव कधी कोसळेल, याचा भरवसा नाही, त्यासाठी मनपा प्रशासनाने या नागरिकांचे वेळीच स्थलांतर करणे गरजेचे झाले आहे. जर वेळीच योग्य पाऊले उचलली नाहीत तर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
आश्वासनांव्यतिरिक्त कुठलीच ठोस उपाययोजना नाही-
गढीची दूरवस्था होऊन ती धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणून देखली मनपा प्रशासन एखादी दूर्घटना घडण्याची वाट पाहतेय का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काझी गढी परिसरातील रहिवाशी जीव मुठीत घेऊन या वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना राजकारणी आणि मनपा प्रशासनाकडून आश्वासनांव्यतिरिक्त कुठलीच ठोस उपाययोजना करून दिली जात नसल्याने येथील रहिवाशी दहशतीखाली आले आहे. अनेक वेळा पुराच्या पाण्याने काहींची घरे वाहून गेली, तर काहींचे संसार उघड्यावर आले. यावर प्रशासनाने पंचनामे करून काहींना मदत दिली, तर काहींना वाऱ्यावर सोडले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला आहे.
नाहीतर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार -
काझी गढी येथील नागरिकांना स्थलांतरांच्या नोटीस देण्यापलीकडे मनपा प्रशासन काहीच ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे केवळ नोटीस न देता वेळीच उपाययोजना करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागण्याची शक्यता येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गाडगे महाराज धर्मशाळा ते टाळकुटेश्वर पूल या परिसरात गोदावरी नदीला पूर आला तर येण्या-जाण्यासाठी रस्ता रहात नाही, म्हणून सध्या महापालिका प्रशासनाच्या वतीने येथे गॅब्रियल वॉल व रस्त्याची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. स्मार्ट सिटीच्या निधी या कामात वापरून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक शाहू खैरे यांनी केली आहे.