नाशिक - जिल्ह्यातील पळसे परिसरात पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला आहे. गेल्या महिन्याभरात तीन बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पळसे परिसरात बिबट्याची दहशत आहे. बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आहेत. याच परिसरात मागील दोन महिन्यात दोन लहान बालकांचा बळी गेला आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणात आहे.
राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्याने राज्यभरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. अनेक वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याचे पहायला मिळाले आहे.
नाशिक शहर परिसरातदेखील अनेक वन्यजीवांचा वावर वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिकरोड भागात तर गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांना जीवदेखील गमवावा लागला होता. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नाशिक रोड परिसरात आढळणाऱ्या बिबट्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याची मागणीदेखील परिसरातील नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात आली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्यावतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे चोवीस कॅमेरेदेखील परिसरात बसवण्यात आले. तर बिबट्या निदर्शनाला आलेल्या सर्व ठिकाणी पिंजरा बसवण्याचे काम वनविभागाच्यावतीने हाती घेण्यात आले.
वनविभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे समोर येत आहे. गेल्या वीस दिवसांत वनविभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नाशिक रोड परिसरातून दोन बिबटे जेरबंद झाले. तिसरा बिबट्यादेखील मंगळवारी पळसे परिसरात संतोष गायधनी यांच्या द्राक्षबागेत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
शेतकरी संतोष गायधनी यांना दोन दिवसांपूर्वीच शेताच्या परिसरात बिबट्या निदर्शनास आला होता. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाकडुन पिंजरा बसवण्यात आला होता. अवघ्या दोन दिवसात बिबट्या जेरबंद झाल्याचे गायधनी यांनी सांगितले आहे.
जेरबंद झालेला बिबट्याला वनविभागाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांत या बिबट्याची बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या परिसरात आणखी बिबट्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.