नाशिक - हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केल्याने तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील हथरस याठिकाणी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पीडित मुलीवर पोलिसानी केलेले परस्पर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबीयांना भेटायला गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की, या सर्व घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढून या घटनांचा निषेध करण्यात येत आहे.
हेही वाचा - दहा रुपयांचे चॉकलेट का आणले, म्हणून चिमुकलीला दिले गरम चमच्याचे चटके
याचेच पडसाद सोमवारी नाशिकमध्ये देखील बघायला मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, युपी सरकार आणि पोलिसांच्यावतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच पीडित कुटुंबीयांना शासनाने वाय प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.