नाशिक - देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या 'मरकझ' या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरोनाबद्दल किती बेफिकिरी दाखवली जात आहे, हे समोर येत आहे. निजामुद्दीन येथील संमेलनात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक लोक सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
हेही वाचा... देशात चर्चा ! हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमकं काय?
दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात नाशिक शहरातील 50हून आधिक नागरिक सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील 21 जणांचा शोध घेण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही 20 ते 25 नागरिक नाशिक शहर आणि जिल्ह्यात असल्याने पोलिसांच्या मदतीने प्रशासन त्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहे.
या सर्व प्रकरणाने नाशिकमधील जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नाशिककरांमध्येही या बातमीने भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी मरकझच्या या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन घराबाहेर जाण्याचे टाळावे. शिवाय दिल्ली येथील या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वतः हून जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी आणि सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.