नाशिक - लॉकडाऊन काळात जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात आज राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढून वीजबिल माफ करण्याची मागणी केली. नाशकातही मनसेच्या वतीने या वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक मनसैनिकांनी गळ्यात वाढीव वीज बिलांच्या माळा घालून टाळ वाजवत आंदोलन केले. तसेच घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा निषेधही व्यक्त केला.
सरकार करते जनतेचे खिसे साफ-
नाशिकच्या मनसे कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील मनसे नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी गळ्यात वाढीव वीज बिलांच्या माळा घालून टाळ वाजवत ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी मनसैनिकांनी "हाती नाही काम आणि एमएसीबीचे तिप्पट दाम","गरीब मंत्र्यांचे वीज बिल माफ, सरकार करते जनतेचे खिसे साफ" आशा प्रकारचे फलक झळकवत वाढीव वीज बिलावरून सरकार विरोधात आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर आंदोलक मनसैनिकांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना वीज बिल कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. तसेच सरकारने लवकरात लवकर वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत निर्णय नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
उर्जामंत्र्यांकडून जनतेची फसवणूक-
लॉकडाऊन काळात सरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी जनतेची लूट करण्याचे काम केलं आहे. 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करायचे सांगून नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव करत जनतेची फसवणूक केली आहे. येत्या काळात सरकारने वाढीव वीज बिल दरवाढ थांबवली नाही तर मनसेकडून महाराष्ट्रात मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते सलीम मामा शेख यांनी दिला आहे.