नाशिक - राज्याचे अन्न पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. स्वतः भुजबळांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. तसेच, मंत्री भुजबळ कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह अन्य मंत्र्यांच्या संपर्कात आले होते. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
संपर्कात आलेल्या व्यक्तींनी टेस्ट करावी-
'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तब्येत ठीक असून मागील दोन तीन दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी',तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ सध्या नाशिकच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी क्वांरटाइन आहेत.
शरद पवार यांच्या समवेत होते भुजबळ -
देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. तसेच भुजबळ हे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून त्यांनी कालच बैठक देखील घेतली होती. तसेच कोरोना संदर्भात अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक देखील त्यांनी घेतली होती. मात्र या सर्व कार्यक्रमात भुजबळ यांनी मास्कचा नियमित वापर केल्याचे दिसून आले आहे.