नाशिक - लोकसभा मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ वॉर सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या नाशकात सोशल मीडियामध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर माणिकराव कोकाटे यांना झालेल्या धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ आहे. माणिकराव कोकाटे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाषण करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सरकारविरोधात भाषण करू नको, असा दम भरला होता. त्यानंतर कोकाटे यांना व्यासपीठावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. हा जुना व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हायरल होताना पाहायला मिळतो.
मराठाद्वेषी कोकाटे या आशयाखाली हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून राजकीय नेत्यांचे वाद-विवादाचे जुने व्हिडिओ, फोटो लोकसभा निवडणुकीदरम्यान व्हायरल होताना दिसून येत आहेत.