नाशिक - जिल्ह्यात जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, या काळातही शहरातील विलोळी परिसरात अवैध दारू विक्री केली जात होती. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ६२ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात सरकारकडून मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, विलोळी परिसरात मध्यप्रदेश निर्मित अवैध मद्य विक्री होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दोघां जणांना ताब्यात घेतले असून मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुले यांनी दिली.
नवनाथ धोगंडे, प्रकाश खेमाणी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून विनापरवाना विक्रीसाठी असलेला मध्यसाठा जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा कसा उपलब्ध झाला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.