नाशिक - आनंदवली शिवारातील मोठा प्रकल्प उभारण्यासाठी भूमाफियांकडून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकल्पास जमिनी देण्यास विरोध केल्याने ३० लाख रुपयांची रोकड व १० गुंठे जमिनीची सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
१२ संशयितांना ताब्यात, दोन संशयित अद्यापही फरार-
गेल्या आठवड्यात आनंदवली शिवारात रमेश मंडलिक (७५) यांची धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात तब्बल १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन संशयित अद्यापही फरार आहेत. मंडलिक खून प्रकरणात भूमाफियांचे हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील भूमाफियांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी दिले आहे.
संशयितांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी-
मंडलिक खून प्रकरणी संशयित सचिन मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल जयराम मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, वैभव वराडे, सागर ठाकरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर रम्मी राजपूत, जगदीश मंडलिक फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे उपआयुक्त तांबे यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयाने संशयितांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- संजय राठोड यांच्या राजीनाम्याची शक्यता?