नाशिक - साहेब आम्ही पाया पडतो, एक तरी ऑक्सिजन बेड द्या ना, नाही तर आमच्या माणसाचा जीव जाईल अशा प्रकारचे रोज शेकडो फोन मनपाच्या हेल्पलाईन नंबरवर येत असतात. मात्र, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड फुल्ल असल्याने नातेवाइकांना नाही हा शब्द कानावर पडतो ही परिस्थिती नाशिक जिल्ह्याची झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी रूग्णालयाचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड फुल झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होत आहे. नाशिक जिल्ह्यात 45 हजार कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यातील बहुतेक रुग्ण होम क्वांरटाइन होऊन घरी उपचार घेत आहे. मात्र, आरटीपीसीचा स्कोर वाढला आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाली की नातेवाईकांची बेड शोधण्यासाठी धावपळ होत आहे. अशात सर्वच रूग्णालया मधील ऑक्सिजन बेड फुल असल्याने नातेवाईकांना अनेक रूग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
उत्पादन पेक्षा ऑक्सिजन दुप्पट मागणी -
महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात देखील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्याला रोज 130 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असताना केवळ 85 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दोन दिवसापूवी ऑक्सिजन ट्रेन च्या माध्यमातून नाशिक 28 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला होता. हा ऑक्सिजन केवळ अर्धा दिवस पुरेल इतकाच होता त्यामुळे नाशिककरांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, अजून देखील ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे.
रुग्णांना हलवण्याचा सल्ला -
नाशिक शहरातील 13 मोठ्या रूग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. ज्या रुग्णालयांना पुरवठा झाला तो देखील पुरेसा नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे दोन दिवसापासून ऑक्सिजन बेड, बायोपिकची सुविधा असून सुद्धा रुग्णांना उपचार देणे शक्य होत नाही. ऑक्सिजन नसल्याने काही रूग्णालयांनी नातेवाईकांना रुग्ण शिफ्ट करून घेण्यास सागितले आहे. काही नातेवाईक तर थेट ऑक्सिजन पुरवठा कंपन्याकडे जाऊन पोहचल्याचे चित्र दिसून आले.