नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना २८ मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रक कंटेनर नांदगाव पोलिसांनी पकडला होता. पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेऊन त्यातील २८ मजुरांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना 'शेल्टर हाऊस' मध्ये ठेवले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा... पोलीस अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगारासह 'बोनस'; तेलंगाणा सरकारची घोषणा!
दीपक सुरवडकर हे आपल्या पथकासह रेल्वे गेटजवळ नाकाबंदी करत होते. त्याचवेळी येवल्याकडून येणारा कंटेनर (क्र. आर.जे. 09 जी.बी. 3375 ) पथकाला दिसला. कंटेनर चालकाची चौकशी केली असता तो संगमनेरहून मध्यप्रदेशात जात असल्याचे चालक गरणामसिंग प्रीतमसिंग सरदार (रा. गुरुदासपूर, पंजाब) याने सांगितले. पोलिसांना त्यांची थोडी शंका आल्याने त्यांनी कंटेनरचा मागील दरवाजा खोलण्यास सांगितले. त्यावेळी त्या कंटेनरमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागातील २८ मजूर होते.
पोलिसांनी हा ट्रक कंटेनर ताब्यात घेऊन त्यातील २८ मजुरांची वैद्यकीय तपासणी करत, त्यांना 'शेल्टर हाऊस' मध्ये ठेवले आले. दरम्यान, पुणे येथून निघालेला हा ट्रक कंटेनर व त्यात संगमनेरजवळून बसलेले हे मजूर सगळीकडे नाकाबंदी असतांना इथपर्यंत पोहोचलेच कसे, याची चर्चा सुरू आहे.