नाशिक - मखमलाबाद व हनुमानवाडी येथे स्मार्ट सिटीतील हरित क्षेत्र विकासअंतर्गत प्रस्तावित टीपी स्किमला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुनावणी न घेताच योजनेला मंजुरी दिल्याचा दावा या परिसरातील शेतकऱ्यांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे न्यायालयाने टीपी स्किमला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाला मंगळवारी उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. सिटी कंपनीच्या हरित क्षेत्र विकास अंतर्गत हनुमान वाडी आणि मखमलाबाद परिसरातील सुमारे साडेसातशे एकरवरील जागेत ग्रीनफिल्ड प्रकल्प राबवण्यात येणार होता. मात्र यात अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. दरम्यान स्मार्ट सिटी कंपनी शेतकर्यांच्या विरोधाला जुमानत नसल्याने शेतकरी कृती समितीने याविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच मंगळवारी उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय सुनावला आहे.
दरम्यान पुढील न्यायालयीन सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेऊ नये, अशा सूचना मनपा आयुक्तांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ग्रीनफिल्ड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत हा प्रकल्प नाशिककर आणि शेतकरी हिताचा असल्याचा विश्वास मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न
दरम्यान या योजनेला परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने त्यांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट सिटी कंपनीने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आता या प्रकल्पाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे संबंधित प्रकरणाच्या पुढील सुनावणीमध्ये उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांसह महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.