नाशिक - सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सलग दोन तास जोरदार झालेल्या पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली आहे. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची योग्य सफाई केली नसल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात, दुकानात साचले होते.
गोदावरी नदी काठच्या दहीपुल, सराफ बाजार भागातील बाजारपेठेत पाणी घुसल्याने दुकादारांची धावपळ उडाली. तसेच अनेक दुकानात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने दुकानातील हजारो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. महानगरपालिकेने मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली नसल्याने ही परिस्थिती उद्धभवली असल्याचे दुकानदारांनी म्हटले आहे.
एकीकडे कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच दुकाने सुरू करण्यात आली असली तरी व्यवहार पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यात अचानक आलेल्या असमानी संकटामुळे दुकानदारवर्ग हताश झाला आहे.
गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली
सलग चौथ्या दिवशीसुद्धा दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या नदीला अनेक लहानमोठे नाले येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या गंगापूर धरणातून कुठलाही विसर्ग करण्यात आला नसला तरी पावसाचे पाणी नदीत मिसळत असल्याने होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.