नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशासनाला लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, असा सूचक इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. कोरोनाच्या बैठकीनंतर भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते.
नियोजन भवन येथे बैठक
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनावर मात केल्यानंतर नाशिकला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांड्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
'लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका'
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून सद्यस्थितीतील उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजाराच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशासनाने यावर लक्ष ठेवावे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्ती मास्क घालत नाहीत, त्यांना दंड करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
'थेट दुकाने सील करा'
मास्क नसलेल्या ग्राहकांना जे दुकानदार सेवा देत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जी कार्यालये आणि दुकाने कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतील त्यांची दुकाने थेट सील करावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिसांना दिले आहेत.
'दिवसाला 20 हजार चाचण्या होणार'
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रेसिंग वाढवण्यात येत आहे. सध्या जिल्हा रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात एका दिवसात 10 हजार जणांच्या स्वॅब तपासणीचे नियोजन करण्यात आले असून खासगी लॅबमध्येही 10 हजार स्वॅब तपासणी केली जाणार आहे.
'...तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे'
घरात जागा नसेल तर होम क्वांरटाइन रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे. एकट्या नाशिक शहरात ८ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 6 हजारांहून अधिक रुग्ण होम क्वांरटाइन राहून उपचार घेत आहेत. मात्र अशात कोरोनाबाधित व्यक्तीला घरातील वेगळ्या रूममध्ये राहण्यास जागा नसेल त्यांनी कुटुंबातील इतर व्यक्तीचा जीव धोक्यात न घालता थेट कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.