नाशिक - येथील ओझर विमानतळावरुन आंतराराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरू होणार असून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा एचएएलला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
ओझर विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेशास केंद्राचा हिरवा कंदील -
नाशिक ते सौदी अरेबिया विमानसेवा सुरू होणार असून ओझर विमानतळावरुन हज-उमराह यात्रेसाठी आता थेट विमानसेवा सुरू होणार आहे. काही दिवसांत हज टर्मिनलच्या यादीत ओझर विमानतळाचा समावेश होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी होणार लाभ -
नाशिक-मुबंई ऐवजी नाशिक येथून हज येथे जाणाऱ्या भाविकांना विमानसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ओझर विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश करावा. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांचे गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र शासनाकडे केली होती. त्यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याला आता यश येऊ लागले आहे. याविषयीची शिफारस राज्य शासनाकडून केंद्राकडे जाणे आवश्यक असल्याने दोन महिन्यांपूर्वीच खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून तशी शिफारस राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून केंद्राकडे पाठविण्यात आली होती. खासदार गोडसे यांची हज यात्रेकरूंविषयी असलेली तळमळ आणि त्यांची न्यायिक मागणी पाहून ओझर विमानतळाचा टर्मिनलच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावास केंद्राने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे.
हे ही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जीवित व वित्तहानी नाही
ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचा अहवाल येथील प्रशासनाने केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाला शनिवारी पाठविला असून यामुळे आता लवकरच येथून हजसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओझर येथून सुरू होणाऱ्या विमान सेवेचा फायदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.