नाशिक - स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून 75 लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार, नाशिक शहरत घडला आहे. हा प्रकार मखमलाबाद परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे. यामध्ये 75लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
'48 तासांत केली अटक'
याप्रकरणी ईश्वर त्रिभुवन गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. केवळ 48 तासातच पोलिसांनी 3 आरोपींना 75 लाख रोख रकमेसह अटक केली आहे. तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी संशयित साळुंके व संतोष यांनी गुप्ता यांची भेट घेतली. आपल्याकडे कस्टममध्ये अडकलेले अडीच किलोपेक्षा अधिक सोने असल्याची माहिती त्यांनी गुप्ता यांना दिली. ते सोने उघडपणे बाजारात विक्री करता येत नाही. यामुळे सोन्याच्या चालू दराच्या तुलनेत, ते खूप स्वस्तात देत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी 30 हजार रुपये तोळा या भावात व्यवहार ठरला होता. यासाठी त्यांनी प्रत्यक्ष सोन्याचे काही खरे तुकडे गुप्ता यांना दाखवले. ते गुप्ता यांनी सोनाराकडून तपासून खरे असल्याची खात्री केली. त्यानंतर गुप्ता यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. सोने घेण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी गुप्ता यांना बोलावले. त्या ठिकाणी सोने घेऊन एक व्यक्ती थांबली असल्याचे, सांगितले. 75 लाख रूपयांची बॅग घेऊन ते गुप्ता यांच्यासह आडमार्गे मखमलाबाद रोडला घेऊन गेले. मात्र, या भामट्यांनी सोने न देता, पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. हे व्यापाऱ्याच्या लक्षात येताच, त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हा प्रकार सांगितला. 75 लाख रुपये रक्कम बघून पोलिसांनी हा तपास अधिक वेगाने केला. दरम्यान, संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीने आणखी किती जणांना असा गंडा घातला आहे, या संदर्भात अधिक तपास क्राईम ब्रँच करत आहे.