नाशिक - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज नाशिक शहरात आणखी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व कोरोनाबाधित अंबड लिंक रोड येथील कोरोनाबाधित रुग्णांचे निकटवर्तीय आहेत. या सर्व रुग्णांवर आता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या ४ रुग्णांच्या अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 74वर पोहचला आहे.
नाशिक जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आज दिनांक 18 एप्रिलला नाशिक शहरातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता नाशिक शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 9वर गेला. प्रशासनने आता अंबड लिंक रोडचा परिसर सील केला आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक काटेकोरपणे उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. तसेच जनेतला विनाकारण घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.