नाशिक - नाशिक मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि मुलगा डॉक्टर अमित कापडणीस यांचा दोन महिन्यापुर्वी खून झाला ( Nanasaheb Kapdanis Murder Case ) होता. याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी एकास अटक केली आहे. राहुल जगताप असे त्याचे नाव असून, मालमत्ता हडप करण्यासाठी हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले ( Nashik Police Arrested Rahul Jagtap ) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारीला शितल कापडणीस यांनी वडील नानासाहेब कापडणीस ( वय 70 ) आणि भाऊ अमित कापडणीस ( वय 35 ) बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या नंतर पोलिसांनी तपास सुरू करत नानासाहेब यांची बँक खाते, डिमॅट खाते व इतर आर्थिक व्यवहार संबंधित माहिती घेतली. यावेळी त्यांच्या इमारतीमध्ये राहणार्या संशयित राहुल जगताप यांनी नानासाहेब यांचे शेअर्स विक्री करून त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा केल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे राहुल यानेच घातपात केल्याचा संशय आला. यात शेअर ट्रेडिंग कंपनीचे मॅनेजर प्रदीप शिरसाठ यांची चौकशी केली. नानासाहेब कापडणीस यांच्या बँक खात्यातून 90 लाखाची रक्कम आरटीजीएस द्वारे संशयित राहुल जगताप याने स्वतःच्या नावावर वर्ग केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता कापडणीस पिता- पुत्राची शहर व परिसरात असलेल्या कोट्यवधीची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याचे त्याने कबूली दिली.
अमितने खून केल्याचा करणार होता बनाव
18 डिसेंबर ते 28 जानेवारी दरम्यान नानासाहेबांचा फोन संशयित राहुल वापरत होता. सावरकरनगर येथील बंगल्याच्या कामासाठी लागणारे पैसे तो देत होता. स्थानिक नागरिकांची तक्रार असल्यानं मनपाने नोटीस बजावली होती, ही नोटीस स्वीकारत राहुलने बांधकाम साइटवर पत्रे लावले होते. कापडणीस हे बंगल्यात राहण्यास गेल्याचा बनाव करत, जुनी पंडित कॉलनी येथे फ्लॅट मधील साहित्य त्यांनी देवळाली कॅम्पला नेऊन ठेवले होते. नानासाहेब यांच्या मुलीने फोन केल्यानंतर संशयित राहुल याचा गोंधळ झाल्याने मुलीला वडील आणि भावाच्या घातपात झाल्याचा संशय आला.
मृतदेह पर जिल्ह्यात टाकले
संशयित राहुल यांनी नानासाहेबांचा खून करून मृतदेह मोखाडा येथे गोंदे गावात निर्जनस्थळी टाकला. ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर स्पिरिट टाकून चेहरा जाळला. दहा दिवसांनी अमितचा खून करून त्याचा मृतदेह राजूर ( नगर जिल्हा ) येथील निर्जनस्थळी टाकून चेहरा जाळला. मोखाडा पोलीस ठाण्यात 18 डिसेंबर 2021 आणि राजुर पोलीस ठाण्यात 28 डिसेंबर 2021 ला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
संशयिताने घेतली रेंजरेव्हर कार
संशयित राहुल जगताप हा शेअर ट्रेडिंग ट्रेडर आहे. नानासाहेब यांचे शहर व परिसरात 4 फ्लॅट, बंगला, गाळा आणि कोट्यवधीचे शेअर एवढी मालमत्ता हडप करण्याचा त्याने प्लॅन केला होता. कापडणीसांचे शेअर्स विकून आलेल्या रकमेतून राहुल रेंजरोव्हर कार भावाच्या नावे खरेदी केली. संशयित याचा हॉटेल व्यवसाय आहे.