नाशिक - राम मंदिरात लागोपाठ दुसऱ्या वर्षीही निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राम नवमी उत्साहाला सुरुवात झाली आहे. दुपारी बारा वाजता निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत रामजन्म साजरा होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरे बंद करण्यात आली आहेत. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला राम नवमी उत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला होता.
भाविकांशिवाय रामजन्म सोहळा
गुढीपाडव्यापासून हा उत्सव सुरू झाला आहे. दरवर्षी हजारो भाविक हा जन्म सोहळा अनुभवतात, मात्र लागोपाठ दुसऱ्या वर्षी देखील मंदिर बंद असल्याने भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडत आहे. मंदिराच्या स्थापनेपासून यंदा सलग दुसऱ्यांदा काळाराम मंदिर हे राम नवमीला बंद आहे. आज भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थित पहाटेपासूनच महाअभिषेक, पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली आहे. मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींचा देखील साजशृंगार करण्यात आला आहे. यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिककरांना घरी बसूनच हा जन्म सोहळा ऑनलाईन पाहावा लागत आहे.
जेथे काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचे बोलले जाते. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात, असेही बोलले जाते. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचे परीक्षण केले गेले. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झाले आहे. १७७८ ते १७९० या कालखंडात मंदिर पूर्ण झाले आहे. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला २३ लाख रु. खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
हेही वाचा - चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून काढणाऱ्या मयुर शेळकेच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप