नाशिक - हळदी सोहळ्यात विना परवाना वाद्य वाजविल्याने नाशिक सरकारवाडा पोलिसांनी (nashik police) वाजंत्रीसह नवरदेव व त्यांच्या वडीलांवर गुन्हा दाखल केला. बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाची वरात (marriage function) पोलीस ठाण्यात पोहचल्याने हा सर्वत्र गंमतीचा विषय ठरला आहे.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील आणि पोलीस आयुक्तालया समोर असलेल्या मल्हारखान झोपडपट्टीमध्ये जोरजोरात ढोल, ताशा ही पारंपरिक वाद्ये वाजवली जात होती. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अचानकपणे पोलीस वाहनाचा सायरन कानी येताच लग्नघरी पडलेल्या मांडवात शांतता पसरली. यावेळी पोलिसांनी नवरदेवाकडे वाद्ये वाजविण्याची परवानगीबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
असा झाला गुन्हा दाखल
हळदीचा कार्यक्रम याठिकाणी सुरू होता. अशात पोलिसांनी तत्काळ वाद्य वाजविणारे वाजंत्री तसेच नवरदेवासह वर पित्यावर कारवाई केली. ठाण्यात त्यांना समज देत विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन करून कोविड-१९ च्या नियमाचे उल्लघंन केले. यामुळे वाजंत्रीसह सहा जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'वाद्याची परवानगी घेणे आवश्यक'
कोरोनाचे नियम शिथील जरी झाले असले तरी राज्य सरकारने काही निर्बंध घालून दिले आहे. कुठल्याही कार्यक्रमात वाद्य वाजवण्याबाबत पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर परवानगी नसेल तर कायदेशीर करावी होऊ शकते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Leopard Attack : बिबट्याचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद