नाशिक - नाशिकच्या पळसे गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत गूळ उत्पादन कारखाना सुरू केला आहे. या ठिकाणी नैसर्गिक रित्या गूळापासून तयार होणाऱ्या पदार्थांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नाशिकमध्ये सुरु झालेला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत ( Farmers Started Natural Jaggery Factory ) आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष पाठोपाठ ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. पण, अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती देखील शेतकऱ्यांना असते. आता शेती ही शाश्वत राहिली नाही, असा सुर देखील शेतकऱ्यांमधून ऐकायला येतो. कधी निसर्गाने साथ दिली नाही, तर बाजारात मालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. हीच बाब हेरून नाशिकच्या पळसे गाव भागातील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येत 'नाशिक हनी बी फार्मर प्रोड्युसर कंपनी' नावाने गूळ कारखाना सुरू केला. ऊसापासून नैसर्गिक रित्या दर्जेदार गूळ तयार करून त्याच्यापासून गूळ पावडर, क्यूब आणि भेली तयार केली जात आहे. पहिल्याच वर्षी या गूळाच्या पदार्थांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ऊसाला योग्य भाव मिळत असल्याने काही महिन्यात 1500 हुन अधिक ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याला जोडले गेले आहे.
आरोग्याबाबत नागरिक जागृत - आताच्या काळात प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहे. अशात ग्राहकांना नैसर्गिक आणि चांगल्या पध्दतीचे अन्न पदार्थ मिळावे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येत गुळ उत्पादनाची कंपनी सुरू केली आहे. हे आमचे पाहिले वर्ष असून, यात आम्ही गूळ बनवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल्स आणि कलर टाकले नाही. गोड जरी नसला तरी त्यात साखर टाकली नाही, असे करत नैसर्गिकरित्या गूळ बनवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. मागील सहा महिन्यांत आम्ही गूळ पावडर, क्युब, भेली आणि चॉकलेटचे उत्पादन घेत असून, याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा नैसर्गिक गूळ चहात वापरल्यावर तो फाटत नाही. तयार होणाऱ्या गूळाच्या पतची तपासणी लखनौमधील लॅब मधून केली असून, त्यांनी देखील आमच्या गूळ उत्पादनाचे कौतुक केले आहे. त्यात आम्ही गूळ तयार करण्यासाठी उच्च प्रतीच्या ऊसाची निवड करत केली आहे. कंपनीमधील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे, अशी माहीती गूळ कंपनीचे संचालक विष्णुपंत गायखे यांनी दिली.
गूळ खाण्याचे फायदे - गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, जस्त आणि तांब्याचे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिनमध्ये प्रामुख्याने फॉलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स सारखी जीवनसत्त्वे असतात. म्हणजे गुळ हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. तसेच, पौष्टिक कमतरता देखील पूर्ण करतो. सर्दी व खोकल्यापासून बचाव करण्यासाठी गूळ खूप प्रभावी मानला जातो. काळीमिरी आणि आल्याबरोबर गूळ खाल्ल्यास थंडीच्या ऋतूमध्ये या समस्येपासून आराम मिळतो. आल्याबरोबर गूळ खाल्ल्याने घसा खवखवणे आणि जळजळ होण्यासारख्या समस्या थांबतात. गॅस किंवा आंबटपणाची तक्रार असेल तर गूळ खाल्ल्याने त्याचा फायदा होतो. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचन क्षमता चांगली राहते. गूळ खाल्ल्याने भूक देखील वाढते. गुळामध्ये शरीरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता आहे. नियमित आणि मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन केल्यास आरोग्यास फायदे आहेत. गूळ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात, तसेच रक्त शुद्ध झाल्याने त्वचा आणि स्वच्छ आणि निरोगी राहते.