नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद आणि हनुमान वाडी परिसरात राबवण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी आज विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाला विरोध करत स्थानिक शेतकऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकच्या मखमलाबाद आणि हनुमान वाडी परिसरातील 303 हेक्टर क्षेत्रात नगर रचना दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याठिकाणी टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यासाठी मंगळवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, 60 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पासाठी विरोध असतानादेखील या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक महानगरपालिके बाहेर या विरोधात आंदोलन केले. या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यात याव्यात यासाठी आपल्यावर दमदाटी करून दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी केला.
मखमलाबाद आणि हनुमानवाडी येथील हरीत क्षेत्र विकास योजनेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी मंजुरी दिली असली तरी मात्र महापालिकेने विरोध असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. संतप्त शेतकर्यांनी नाशिक महानगरपालिके बाहेर आंदोलन केले आहे. तसेच आपला या प्रकल्पाला विरोधच असल्याचे स्पष्ट केल्याने आता ग्रीन फिल्ड प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी बोलवण्यात आलेल्या महासभेमध्ये या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येणार का हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.