नाशिक- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकाचे वाचन करून 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असं आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना केले.
भुजबळ म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करोडो लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला आहे. बौद्ध धर्माची दीक्षा दिली. भारताला एक अप्रतिम असे संविधान लिहून दिले आणि या संविधानात भारतावर ज्यावेळेस कोरोना सारखे भीषण संकट येतात त्यावेळी उपयोगात येणारे वेगवेगळे कायदे त्यांनी नमूद केले आहेत.
या कायद्याच्या आधारे केंद्रशासन व महाराष्ट्र शासन कोरोना पासून आपल्या व्यक्तीनां वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता नुकताच 11 एप्रिल आपण महात्मा फुले यांच्या जन्मदिवस हा ज्ञानाचा दिवा लावून घरात साजरा केला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा अतिशय थोर पुरुष होते. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आणि उपदेश केला की, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून 14 एप्रिलला निश्चितपणे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहे त्याचे वाचन आपण घराघरात करूया व त्यांनी केलेला उपदेश त्याचे पुन्हा एकदा स्मरण करूया. असे ही भुजबळ यांनी म्हटले आहे.
कोरोना पासून बचावासाठी बाबासाहेबांची जयंती, जी आपण खरे तर मोठ्या उत्साहाने महिनाभर साजरी करत असतो. परंतु यावेळी आपल्याला तसे करता येणार नाही. घरातच आपण हा दिवस वाचन दिवस म्हणून साजरा करूया केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला सहकार्य करून बाहेर न जाता घरातच बाबासाहेबांचे स्मरण करूया असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.