नाशिक - येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. वर्षातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. तिन्ही मूर्तींना सुवासिक तेल उटणे लावून स्नान घालण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांना श्री रामांचे दर्शन घेता येणार नसले तरी अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही साधेपणाने जपण्यात आली आहे.
कोरोनामुळे साधेपणाने झाली पूजा -
दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या श्री काळाराम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात दिवाळी साजरी होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षीची पूजा अगदी साधेपणाने पार पडली. शनिवारी पहाटे श्री काळाराम मंदिरामध्ये मोठ्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि इतर विधी पार पडले. प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. तसेच तिन्ही मूर्तींना सुवासिक तेल उटणे लावून मंदिरातील पुजाऱ्यांच्यावतीने पुरुषसुक्ताचे आवर्तन करून तिन्ही मूर्तींवर अभिषेक करण्यात आला. शनिवारी पहाटे झालेल्या या सोहळ्याने मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले.
आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट -
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच पारंपारिक पद्धतीने गेल्या वर्षानुवर्षांपासून होत असलेले पूजाविधी आणि कार्यक्रम यावर्षी देखील पार पडणार असून अत्यंत साधेपणाने हे कार्यक्रम करण्याचे नियोजन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. दरवर्षी हजारो भाविक दिवाळीनिमित्ताने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. असे असले तरीही भाविकांनी आपल्या घरूनच श्रीरामांची मनोभावे पूजा अर्चा करावी, असे आवाहन मंदिरचे पूजारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा, जवानांसाठी एक दिवा लावण्याचे केले आवाहन