नाशिक - शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजार पेठेत उसळणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी चौकात बॅरिकेट्स लावले आहेत. हे काम सुरू असल्याने शहरात लॉकडाऊन होणार, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यावर पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी स्पष्टीकरण दिले असून लॉकडाऊन लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजारपेठांमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी -
शहरात लॉकडाऊन होणार असल्याच्या असल्याच्या चर्चांना शनिवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते. शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन येत्या काळात संचारबंदी लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याबाबत दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र, शनिवारी पोलीस प्रशासनाच्यावतीने बाजारपेठांमध्ये बॅरिकेट्स लावले जात असल्याने शहर लॉकडाऊन होण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात होते. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारची संचारबंदी लागू करण्यात येणार नसून या उपाययोजना केवळ बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी रोखण्यासाठी करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहे.
अफवांवर नाशिककरांनी विश्वास ठेवू नये -
नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लॉकडाऊन बाबत नागरिक अनेक तर्कवितर्क लावत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत असलेल्या अफवांवर नाशिककरांनी विश्वास ठेवू नये, असा आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात 51 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण