नाशिक - करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कोरोना बधितांचा आकडा
वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मजूर संघाने स्थानिक व्यवस्थापनाशी बोलणी करून आठ दिवस प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बाबतचा प्रस्ताव दिल्लीला केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. यावर निर्णय आला असून 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यँत पाच दिवस नोट प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. यानंतर देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असणाऱ्या प्रेसवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस हे दोन महत्त्वाचे घटक देखील जवळपास बंद होते. दोन महिन्यानंतर सर्व शासकीय नियमांचा अवलंब करून ही दोन्ही प्रेस सुरू करण्यात आली. परंतु हळूहळू प्रेस मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, गेल्या दोन ते तीन महिन्यात दीडशेहून अधिक कामगारांना कोरोनाची बाधा झाली असून काही जणांचा मृत्यू देखील झाला.
यामुळे कामगारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कौटुंबिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये, म्हणून भीती बाळगत येथील कामगार परिस्थितीला सामोरं जात होता. मात्र आता बाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढू लागल्याने मजूर संघटनांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला होता. यावर आता यावर निर्णय आला असून 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यँत पाच दिवस नोट प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 5 दिवस नोट प्रेस बंद करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.