नाशिक : उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून नाशिकमध्ये श्रेयवादाचे राजकारण बघायला मिळत आहे. नाशिकमधील के.के. वाघ ते जत्रा हॉटेल येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंनी रविवारी फित कापून केले. यावर बोलताना "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमध्ये होते, त्यांच्या हस्तेही फित कापता आली असती" अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत हा सोहळा व्हायला हवा होता असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
हेमंत गोडसेंनी कापली फित
शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी के.के.वाघ ते जत्रा हाटेल येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. या कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ आणि नाशिकमधील शिवसेना नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही. यावर प्रतिक्रिया विचारली असता शहरातील वाहतूक कोंडी फुटावी यासाठी ऐतिहासिक पूल आम्ही बांधला. त्याचे उदघाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. आता नवीन विस्तारीत पुलाचे उद्घाटनही केंद्रीय मंत्र्याकडून व्हायला हवे होते असे भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमध्येच होते, त्यांच्या हस्तेही फित कापता आली असती असेही भुजबळ म्हणाले.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
उड्डाणपुलावरून शिवसेना आणि भाजपत श्रेयवाद रंगला होता. आता पुन्हा एकदा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्ममंत्री नाशिकमध्ये असताना रविवारी घाईघाईने शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी उड्डाणपूलाचे लोकार्पण केले. यामुळे केवळ भाजपमधील नव्हे तर शिवसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता भाजपकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या मागणीवरून पूल खुला केला-गोडसे
दरम्यान, लोकार्पण प्रसंगी बोलताना आधीचे उड्डाणपूल कुणाच्या कारकिर्दीत तयार झाले आणि कुणी उद्घाटन केले हे माहिती नाही. परंतू या उड्डाणपुलाचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. रहदारीसाठी हा उड्डाणपूल खुला व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. त्यामुळे आज हे उद्घाटन केल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले.
हेही वाचा - Shravan Monday: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दार सलग दुसऱ्यावर्षी भाविकांसाठी बंदच, पोलीस बंदोबस्त तैनात