नाशिक - कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करावे. आरोग्य विभाग, प्रशासन यंत्रणेने काटेकोरपणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेऊन लसीकरणासंदर्भात नियोजन करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नाशिकमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर येथील ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे कोरोना विषयक आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
कोरोनातून जे रुग्ण बरे झाले त्या रूग्णांना वेगवेगळे आजार
कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रूग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यातील नंदुरबार, पुणे, जालना, नागपुर येथे ड्राय रन घेण्यात आला असून तो व्यवस्थित पार पडला असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येणार
कोरोन काळात महत्वाची कामगिरी कोरोना योद्धांना त्यांचे मानधन वेळेत देण्यात यावे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येणार असल्याने त्याबाबत जिल्ह्याच्या रिक्त पदांची माहिती सादर करण्यात यावी. नव्या कोरोनामुळे इंग्लंडवरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून ते नागरिक पॉझिटिव्ह आढळल्यास त्याबाबत योग्य ती काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहे.
निधीत कोणत्याही प्रकारची कपात नाही
कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य विभाग, मदत पुनवर्सवन, अन्न नागरी पुरवठा, पोलिस यंत्रणा अशा महत्वाच्या विभागांना देण्यात येणाऱ्या निधीत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. चालु वर्षातील उर्वरित तीन महिन्यात जिल्हा नियोजन समिती व स्थानिक विकास निधी यांचा वापर लोककल्याणासाठी करण्यात यावा.
जिल्ह्यातील परिस्थिती
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ऑक्सिजनची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून आजच्या स्थितीला साधारण 85 मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच व्हेंटीलेटरर्स बेड देखील पुरेशा प्रमाणात आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यतमातून पाच हजार कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून 667 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. उद्यापासून जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात येत असून त्याअनुषंगाने देखील योग्य काळजी घेण्यात येत आहे. अशी माहिती बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली.
हेही वाचा - अजित पवारांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर