नाशिक - विमा कंपन्यांचे कोरोनावर उपचाराकरता आरोग्य विमा योजनेसाठी ठोस धोरण नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खासगी रुग्णालयांनी कॅशलेस विमा योजनेला ब्रेक लावला आहे. त्यामुळेच रोख पैसे दिल्यावरच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
कॅशलेस आरोग्य विमा योजना असूनही सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दर दिवसाला १ हजार ते १ हजार ५०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे.
जिल्हा प्रशासनाने शहरातील १०० खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र, काही खासगी रुग्णालयांकडून कोरोनाच्या रुग्णांना रोख पैसे भरण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळेच वेळेवर पैसे उभे करण्यासाठी कोरोनाच्या नातेवाइकांची ओढाताण होताना दिसत आहे.
हेही वाचा-धबधब्याच्या पाण्यात पोहण्याची हौस बेतली जीवावर;दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू..
विमा कंपन्यांचे धोरण नसल्याने विमाधारकांना फटका
भविष्यात कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्य समस्या निर्माण झाल्या तर वेळेवर पैसे मिळण्यासाठी रोकडविरहित विमा योजना घेतात. मात्र, जागतिक महामारीत विमा कंपन्यांनी कोरोनाबाबत ठोस धोरण आखले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. बहुतेक रुग्णालयांमध्ये आधी रोख पैसे भरल्यानंतरच उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी पैसे जमा करताना धावपळ करावी लागत आहे.
हेही वाचा-नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार, मराठा समाजाची रणनीती ठरली!
आम्ही एकदम लाखो रुपये आणायचे कोठून...
विमाधारक उमेश कोष्टी म्हणाले, की आम्ही वर्षाला बचत करून १७ ते १८ हजार रुपयांची कुटुंबासाठी विमा योजना घेतो. मात्र कोरोना आजाराबाबत खासगी रुग्णालयाकडून आधी एक ते दीड लाख रुपये भरा, असे सागितले जाते. मगच रुग्णांवर उपचार केले जातात. एकीकडे टाळेबंदीमुळे कामधंदे राहिले नाहीत. आम्ही आर्थिक अडचणीत असताना उपचारासाठी लाखो रुपये उभे कसे करायचे, असा प्रश्न आहे.
खासगी रुग्णालयांकडून हा करण्यात येतो दावा-
डॉ. संजय धुर्जड म्हणाले, की सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णालयातील क्षमता संपली आहे. अशात आमच्या रुग्णालयावर ताण वाढला आहे. त्या मानाने मनुष्यबळ कमी आहे. या काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्यावा लागत आहे. औषधेदेखील आगाऊ पैसे देऊन खरेदी करावे लागत आहे. जैविक वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही पैसे द्यावे लागत आहेत. ऑक्सिजनसाठी जादा पैसे मोजावे लागतात आहेत. अशात विमा कंपन्यांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी किती पैसे देणार हे धोरण ठरविले नाही. त्यामुळे आम्ही सध्या कॅशलेस सुविधा बंद केली आहे. आधी पैसे भरा असे रुग्णांना सांगून त्यांना विमा दाव्यासाठी त्यांना फाइलदेखील बनून देत आहोत, असे डॉक्टर संजय धुर्जड यांनी सांगितले आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये रोकडविरहित आरोग्य विमा योजना मिळवून देण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नाशिककरांमधून व्यक्त होत आहे.