नाशिक- जुन्या वाड्यात राहणाऱ्या भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी मालकांशी संगतमत करून नोटीस देण्याचे रॅकेट महानगर पालिकेत कार्यरत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी केला आहे. मागील पंधरा दिवसांपासून नाशिकमध्ये जुने वाडे कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नाशिकच्या गावठव भागात 50 ते 100 वर्ष जुने शेकडो वाडे आहेत. यातील अनेक वाडे मोडकळीस आले आहेत. या महिन्याभरात जीर्ण झालेले 4 वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोडकळीस आलेल्या वाडा मालकांना वाडे खाली करण्याच्या सूचना देत असते. याही वर्षी जवळपास 175 जुन्या वाड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, तरी सुद्धा वाडे मालक आणि भाडेकरी यांच्या असलेल्या वादामुळे वाडे खाली होत नाहीत.
पावसाळा संपला की धोकादायक वाड्यांचा विषय महानगरपालिकेसाठी संपतो अशी एकंदर परिस्थिती आहे. खरे पाहता महानगरपालिकेने 30 वर्षानंतर इमारती किंवा वाडे यांचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी जुन्या नाशिकातील तांबट लेन भागात वाडा कोसळल्याने दोन जिवलग मित्रांचा जीव गेला होता. त्यानंतर सुद्धा महानगर पालिकेने जीर्ण झालेल्या वाडा मालकांना नोटीस देऊन वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोकांच्या जीविताशी निगडित असलेल्या वाड्यांबाबत महानगरपालिकेने सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे असून वाडा मालक आणि भाडेकरूंमध्ये सामंजस्य घडून आणले तर भविष्यात वाडा कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.