नाशिक - भाजप आमदारा विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा वरिष्ठांनी सन्मान केला. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे चांगल्याच संतप्त झाल्या असून त्यांनी महिलांवर लाठीचार्ज चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिक मधील या घटनेने पोलीस आणि भाजप आमदार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे.
फरांदे यांच्यासह 200 नागरिकांवर गुन्हा दाखल-
नाशिकच्या वडाळा परिसरात एक डॉकटर आणि स्थानिकांमध्ये झालेल्या वादानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र या मोर्चादरम्यान पोलिसांनी मोर्चेकरण्यांवर लाठीचार्ज केला. तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्यासह 200 नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. तेसच लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तांनीच जाहीर कार्यक्रम घेऊन सत्कार केला. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईच समर्थन केले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे दाद मागणार-
पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेनंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या विरोधात स्थानिकांकडून अनेक तक्रारी आहेत. पोलीस आयुक्तांनी त्या तक्रारींची दखल न घेता अशा अधिकाऱ्याचा सन्मान करणं उचित नाही. पोलिसांच्या या भूमिकेविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितल आहे. शिवाय आपण कोणत्याही गुन्हेगाराची बाजू घेतली नाही. महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीचा जाब विचारण्यासाठी त्याठिकाणी गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मोर्चा हा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ-
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी काढलेला मोर्चा हा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. डॉक्टर हल्ल्याप्रकरणी राजकीय लोकप्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला मदत करण्याऐवजी पोलीस ठाण्यावर विनापरवानगी मोर्चा आणला. अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा भविष्यातही बिमोड करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे.
हेही वाचा- खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक, काय आहे पुणे कनेक्शन?