नाशिक - गोदावरी नदीपात्रात वारंवार सांडपाणी सोडून नाशिक महानगरपालिकेचे ठेकेदार प्रदूषण करत आहेत. या ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी महानगरपालिका प्रशासन त्यांना अभय देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. मनपा विरोधात निशिकांत पगारे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे.
गोदावरी नदीवरील टाळकुटेश्वर मंदिर वर्तुळाच्या पूर्वेला आणि पंचवटी अमरधामच्या दक्षिणेला वाघाडी नाल्यातून वाहत येणारे सांडपाणी 3 ऑगस्ट 2020ला गोदापात्रात सोडण्यात आले होते. या संदर्भात याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी तक्रारीसोबत छायाचित्र आणि चित्रीकरण महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले होते. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावली होती. मात्र, ठेकेदाराने आपण पाणी सोडले नसल्याचे सांगितले. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले.
दरम्यान, गोदावरी प्रदूषणासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत पगारे यांनी विचारणा केली होती. या संबंधित ठेकेदाराला महानगरपालिकेने पाच हजार रुपये दंड केला असून तो दंड त्याच्या बिलाच्या रकमेतून वजा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, गोदावरी नदीत सांडपाण्याचा एकही थेंबही जाता कामा नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी देखील लाखो लिटर सांडपाणी गोदापात्रात सोडण्याऱ्या ठेकेदारावर नाममात्र दंडात्मक कारवाई करून मनपा प्रशासन ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी केला. या प्रकरणात महानगरपालिकेची भूमिका संशयास्पद असून दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत पगारे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र दिले आहे.
मनपावर कारवाई व्हावी -
उच्च न्यायालयाने आदेश डावलून वारंवार गोदापात्रात सांडपाणी सोडले जात आहे. तक्रार केल्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यांची भूमिका संशयास्पद व दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनावर कारवाई होणे आवश्यक आहे. म्हणून याबाबत आम्ही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पत्र दिल्याचे गोदावरी नदी प्रदूषणमुक्ती चळवळीचे निशिकांत पगारे यांनी म्हटले आहे.