नाशिक - कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ सोसावी लागत आहे. भाजीपाल्याबरोबर डाळींच्या किंमतीत वाढ झाल्यान नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. यात सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यानंतर डाळींच्या दरातदेखील वाढ झाली आहे. अशा स्थिती नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती प्रति किलो १०० हून अधिक झाल्या आहेत. त्यामुळे काय खावे आणि काय ठेवावे, असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे.नुकतेच नाशिकमध्ये तूर डाळ १०० किलो रुपये होती. सध्या ग्राहकांना प्रति किलो तूर डाळीसाठी १२५ रुपये द्यावे लागतात. उडीद डाळ प्रति किलो १०० रुपयांवरून ११३ रुपये तर चना डाळची किंमत ६३ रुपयांवरून ७२ रुपये झाली आहे.
दुकानदार प्रसाद पाटील म्हणाले, २० वर्षांपासून दुकान चालवित आहे. मात्र, यंदा कोरोना आणि भाववाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोसळले आहे. आमच्यावरील भारही वाढला आहे. गृहिणी नलिनी देसले म्हणाल्या की, डाळी व कडधान्यांच्या किमती या गरिबांसाठी आणि सर्वांसाठी कमी असणे गरजेचे आहे. अनेकांच्या पगारी आणि व्यवहारावर परिणाम झाले आहेत.