नाशिक - महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने ह्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक महानगरपालिकेच्या सर्व इमारतीचे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
जीवितहानी नाही, मात्र...
नाशिक महानगरपालिच्या राजीव गांधी भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील विरोधीपक्ष नेते आणि शिवसेना गटनेते यांच्या कार्यालयाला आग लागल्याची आज दुपारी घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी येऊन त्यांनी पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर पूर्णतः जाळून खाक झाले आहे. हे कार्यालय सॅनिटाइझ केल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आग कशामुळे लागली याच्या चौकशीचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे.
आठ दिवसापूर्वीच फायर ऑडिट
आठ दिवसापूर्वीच फायर ऑडिट झाले होते. भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय इमारतीचे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयात आग नेमकी कशामुळे लागली याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे आयुक्त जाधव यांनी म्हटले आहे.
सॅनिटायझरमुळेच आग लागली?
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने एका खासगी कंपनीला महानगरपालिकेच्या सर्व इमारती सॅनिटाइझ करण्याचे काम दिले आहे. अशात अनेक कार्यालयाच्या रूममध्ये हवा खेळती नसून पॅक बंद आहेत. अशात रूम सॅनिटाइझ केल्याच्या काही वेळातच सॅनिटायझरचा आगीशी संबंध आल्याने या कार्यालयाला आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी केली आहे.