नाशिक - शहर आणि जिल्ह्यातील अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणा एकत्रितपणे कारवाई करणार आहे. आज पोलीस आणि महसूल विभागाच्या एकत्रित बैठक झाल्यानंतर संबंधित निर्णय घेण्यात आला. तसेच अवैध धंद्यांवर करण्यात येणारी कारवाई सर्वंकष व प्रभावी होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती कक्षात कायदा व सुव्यवस्था आणि अनुषंगिक विषयांसाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलते होते.
अवैध व्यवसायांवर नियंत्रण व त्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र असा कायदेशीर नियोजित आराखडा तयार आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित विभागाचीच असेल. परंतू त्यासंदर्भात पोलीस यंत्रणेची आवश्यकता भासल्यास त्याच्यामार्फत सहकार्य घेण्यात येईल. तसेच सर्व संबंधित विभागांचा एकत्रितपणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागामार्फत पूर्व नियोजित कार्यवाहीबाबत पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी, असे पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले आहे.
मागील आठवड्यात नाशिक शहरातील अवैध धंद्याच्या कारवाई विषयावरून पोलीस आणि महसूल विभाग आमने-सामने आला होता. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रानंतर हा नवा वाद उभा राहिला होता. मात्र आज या वादावर पडदा टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्तिक बैठक पार पडली आहे.