नाशिक - ज्ञानोबा व तुकोबांसह सर्व महान संतांच्या पादुका बसने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही पंढरपुरला हेलिकॉप्टर अथवा मर्सडिज गाडीने न जाता एसटीने जावे, असे मत भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी व्यक्त केले आहे.
'पंढरपूरला जाण्यासाठी एक लालपरी द्या'
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आषाढी एकादशीला हेलिकॉप्टर किंवा मर्सिडीज गाडीने पंढरपुरला जाणे हा संत परंपरेच्या शिष्टाचाराचा अवमान होईल. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांना विनंती आहे, की मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यासाठी एक लालपरी द्यावी. तसेच, विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा जिव गुदमरतो. त्यामुळे त्यांनी पंढरपूरला न येता घरीच सुरक्षित राहावे, असही भोसले म्हणाले आहेत.