नाशिक- सराफ बाजारावर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. नाशिक सराफ असोसिएशनच्या माध्यमातून कारंजा भागातील सराफ बाजारात ठिकठिकाणी 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शहरात शासनाकडून 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाआड कुठे ना कुठे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. शहराबाहेरून येत चोऱ्या करणारे चोरटे पसार होत असल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत. अशात महिलांमध्ये सुद्धा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या बाबी डोळ्यासमोर ठेवत नाशिक सराफ असोसिएशनने स्वखर्चाने सराफ बाजार परिसर व पंचवटी भागात तब्बल 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या भागात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. याचे कंट्रोल रूम सराफ असोसिएशनच्या कार्यालयात तसेच सरकार वाडा पोलीस चौकीत देखील राहणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत या सीसीटीव्ही कॅमेरा युनिटचे अनावरण करण्यात आले. सराफ असोसिएशनने घेतलेल्या पुढाकाराचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करत, येणाऱ्या काही काळात शहरात सुरक्षेच्या दृष्टीने 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.