नाशिक - महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच मनपातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत विकासकामांचे श्रेयवाद सुरू झाले आहे. सिडकोतील बहुचर्चात असलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून सेना भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपणे विकासकामे करण्यासाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याने सेनेनं या कर्जाला विरोध केला आहे.
राज्य शासनाकडून 300 कोटींचा निधी आणण्याचं शिवसेनेला आव्हान
सिडको येथील उड्डाणपूलाच्या मागील महिन्यात सेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली असताना या उड्डाणपुलाचा प्रस्तावच आता महापौरांनी रद्द केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना शहरातील विकासकामांसाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी पत्र दिल्यानं नाशिक शहर शिवसेना पदाधिकार्यांनी या पत्राला कडाडून विरोध केला. यामुळे सत्ताधारी भाजपने सेनेचा डाव त्यांच्यावरच उलटत सिडकोच्या त्रिमूर्ती चौक भागात केल्या जाणाऱ्या अडीचशे कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव रद्द केला आहे. शिवसेनेनेच आता या उड्डाणपुलाच्या कामासाठी राज्य शासनाकडून 300 कोटींचा निधी आणण्याचं आव्हान महापौर सतीश कुलकर्णी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल आहे.
राजकीय आकसापोटी कर्जाला विरोध
नाशिक रोड येथील दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भर महासभेत गोंधळ घातल्याचे बघायला मिळालं होतं. यातच आता भाजपने सेनेवर पलटवार करत सिडकोमधील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला स्थगिती दिली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेना कर्जाला विरोध करत असल्याचा आरोप महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, आता महापालिका निवडणूका अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असतानाच शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याच बघायला मिळत असल्याने सध्या याचीच चर्चा शहरभरात सुरु आहे.