नाशिक - NRC आणि CAA च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यात आज बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळतांना दिसून येत नाही आहे. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीसह बंद ला पाठिंबा देणाऱ्यांकडून निदर्शने केली जाणार होती.
मात्र, ती ही वेळेवर होत नसल्याने समोरच असलेल्या व्यावसायिकांनी आपली दुकानं खुली करण्यास सुरुवात केली. शहरातील इतर ठिकाणीही नेहमीप्रमाणे व्यवहार असल्याने बंदचा नाशिकमध्ये फारसा परीणाम दिसून येत नाही आहे.मात्र, या बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांचा मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येवल्यात बंदला अल्प प्रतिसाद -
सीएए ,एन आर सी, एनपीआर सह केंद्र सरकारच्या काही निर्णयांचा निषेध करत येवल्यात वंचित बहुजन आघाडीने बंद पुकारला होता मात्र या बंदला येवलेकरांनी साद न देता आपली दुकाने उघडी ठेवली असून शाळा व कॉलेजही सुरू आहेत. सकाळपासूनच सर्व दुकानदारांनी आपली दुकाने उघडली असून महाराष्ट्र् बंदला येवल्यात अल्प प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार सुरळीत चालू आहे.
महाराष्ट्र् बंदच्या पार्श्वभूमीवर येवल्यात वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने विंचूर चौफुली येथे रस्त्यावर उतरत निदर्शने करण्यात आली. सीएए, एनआरसी, एनपीआरसह केंद्र सरकारच्या काही निर्णयांच्या विरोधात आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने येवल्यात निदर्शने करण्यात आली असून यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.