नाशिक - नाशिकरोड येथील एकलहरे परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास आत्या व भाच्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याने घटना घडली आहे. रेल्वेच्या जोरदार धडकेने दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आले. पोलीस तपासात, मृत महिला जेलरोड भागातील असून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील त्यांचा भाचा असल्याचे समोर आले. आत्या-भाच्याने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्या भाच्याच्या आत्महत्येने खळबळ -
पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक रोड-ओढा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजता नाशिकरोडवरुन भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती ओढा रेल्वे स्टेशनचे उप प्रबंधक प्रमोद क्षत्रिय यांनी नाशिकरोड पोलिसांना दिली. नाशिकरोडपासून डाऊन लाईनवरील किलोमीटर क्रमांक १९२/०२ या ठिकाणी रेल्वे ट्रकवर दोन मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत नाशिक पोलिसांना आढळून आले. महिला व पुरूषांचे मृतदेह असलेल्या ठिकाणापासून जवळच रस्त्यावर एक दुचाकी (एमएच १५ एफवाय ५३५८) पोलिसांना मिळून आली. ही महिला शोभा गंगाधर गोराडे (५१) रा. जेलरोड व त्यांचा भाचा रोषन बाळासाहेब नरवडे (२४) रा. पाथरे, ता. सिन्नर अशी आत्महत्या केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आत्या भाच्याच्या आत्महत्त्येने खळबळ उडाली असून आत्महत्येने कारण समजू शकले नाही, पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाचा दुचाकी अपघातात मृत्यू; महिला आणि मुलगाही जखमी