नाशिक- शहरातील जाळपोळीचे लोण आता नाशिकच्या न्यायालयातही जाऊन पोहोचले आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास न्यायालयात जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवाणी न्यायालयातील आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टातील कागदपत्रांचे गठ्ठे जाळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी या घटनेमागचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
ही घटना घडल्यानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पंचनामा सुरू असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली होती. यापूर्वी देखील याच न्यायालयातून चिखलीकर प्रकरणात फाईल्स गहाळ झाल्याचे समोर आले होते. आणि आता सुरक्षित स्थळी आणि तेही न्यायालयाच्या इमारतीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कागदपत्रांची जाळपोळ कोणी केली याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र एवढे मोठे धाडस कोणी केले, कशासाठी केले, याच्यामाघे काय कारण होते, हे उघडकीस येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.