नाशिक - पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सध्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने गोखले महाविद्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत होत्या. अखेरीस पुणे विद्यापीठांतर्गत काही दिवसांपासून या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊन होणे, लॉग-इन न होणे, तांत्रिक अडचणींमुळे उशिराने पेपर सुरू होणे, हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क न होणे यासारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच गोखले महाविद्यालयात बाहेर हातात फलक घेऊन, या परीक्षा रद्द करण्यात याव्या यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.
विद्यार्थी संघटनेने आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याने, काही वेळातच स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ सक्षम नसल्याचा आरोप करत, या परीक्षा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच असे न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'साहेब एवढ्यात काय होणार?'...नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल