नाशिक - नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एक्सल कंपनीतून चांदीच्या प्लेटा चोरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एक्सल इंजिनिअरिंग वर्क कंपनीमधून या कार्मचाऱ्याने जवळपास 76 हजार रुपयांच्या तीन चांदीच्या प्लेटा चोरी केल्या होत्या.
हेही वाचा - नाशिकच्या मातीत युवा शेतकऱ्याने फुलली काश्मिरी सफरचंदाची बाग
सातपूर पोलिसात गुन्हा दाखल
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात असलेल्या एक्सल इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीमध्ये घडला होता. या ठिकाणी कंपनीत प्लेटिंगच्या कामासाठी लागणाऱ्या चांदीच्या प्लेटांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. 994 ग्रॅम वजनाच्या जवळपास 3 प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याप्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अवघ्या आठवडाभरातच या प्रकरणाचा छडा लावत एक्सल कंपनीत काम करणाऱ्या राहुल सूर्यवंशी या 28 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरी झाल्याचे उघड
आरोपी कंपनीमध्ये ट्रेनी एक्झिक्युटिव्ह पदावर कामासाठी होता. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी कंपनीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यात राहुल सूर्यवंशी याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - ...अन् त्याने किन्नरसोबत केली सुखी संसाराची सुरुवात, कुटुंबीयांनी दिले आशीर्वाद