नाशिक - म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पेठरोडवर असलेल्या पवार मळ्याच्या नाल्याजवळ अज्ञात व्यक्तीने मोरेमळा परिसरात राहणाऱ्या तेवीस वर्षीय पूजा विनोद आखाडे या विवाहितेचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (ता.१९ ) रात्रीच्या सुमाराला पेठरोड नामको रुग्णालया समोर मखमलाबादला जाणाऱ्या रस्त्यावर पवार मळ्यानजिक नाल्याजवळ एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याबाबत म्हसरूळ पोलिसांना एका व्यक्तीने कळवले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या सूचनेनुसार, हवालदार संजय राऊत, सतीश वसावे, मंगेश दराडे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नाल्याजवळ २३ ते २५ वयोगटातील विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. सदर महिलेच्या गळ्यावर, कपाळावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.सदर महिलेची ओळख पटावी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी अन्य पोलीस ठाण्यात कोणी महिला बेपत्ता झाल्याबाबत माहिती देण्यासाठी येते का याची माहिती कळवली.त्त्याच रात्री पंचवटी पोलीस ठाण्यात विनोद आखाडे नामक व्यक्ती पत्नी बेपत्ता असल्याबाबत पोलिसांना सांगण्यासाठी आला. त्यावेळी विनोद यांनी पत्नीबाबत दिलेली माहिती ही पंचवटी पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळ गाठले व मृतदेह दाखविल्यानंतर पत्नी पूजाचा असल्याचे स्पष्ट केले.
मारेकरी रिक्षात आले असल्याचे स्पष्ट
मोरे मळ्यात राहणारे पूजा व विनोद हे पती पत्नी आहेत. विनोद याचा डिजेचा व्यवसाय आहे.पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. तूर्तास पूजा हिचा मारेकरी कोण कोणत्या कारणावरून खून केला याचे कारण गुलदस्त्यात आहे .तर पूजा हिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा अशी शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. मयत पूजा व मारेकरी हे रिक्षात बसून घटनास्थळी आले असावे व त्याठिकाणी वाद झाल्यावर त्या अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला असावा असे पोलिसांनी सांगितले. तर घटनास्थळी रिक्षा चाकांचे मातीवर निशाण उमटले असल्याने मारेकरी रिक्षात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. मात्र, घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून शहरात बळकावत असलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून करण्यात येते आहे.