नाशिक - "सीताबाई मिसळ" हा नाशिककरांचा आवडता ब्रँड बनला असून 93 वर्षांच्या सीताबाई मोरे ह्या तब्बल 76 वर्षांपासून नाशिककरांना सेवा देत आहेत. कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी कुटुंब सांभाळून त्या एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.
नाशिकच्या 93 वर्षीय सीताबाई मोरे यांचा 76 वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहेच. पण, तितकाच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारा देखील आहे. 76 वर्षांपूर्वी लोकांच्या घरी धुणे-भांडी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग-धंद्या करायचा म्हणून सीताबाई यांनी अनेक अडचणींतून स्वतःच जुने नाशिक भागात लहानसे हॉटेल भाडेतत्त्वावर सुरू केले आणि ह्या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी मिसळ विकण्यास सुरुवात केली. बघता-बघता त्यांच्या चवदार मिसळीची चर्चा सर्वच नाशिकमध्ये होऊ लागली आणि आज सीताबाई यांच्या मिसळचा एक ब्रँड झाला असून नाशिक शहारत त्यांच्या तीन शाखा झाल्या आहे. आज त्यांचा ह्या व्यवसायाला मुले आणि नातवंडे देखील मदत करत आहेत.
राजकारणी आणि उद्योजकांची रीघ
दूरदूरहुन सीताबाई यांच्या चटकदार मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांची रीघ लागते. ही मिसळ तिखट नसली तरी त्यांच्या मसाला मिश्रणामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
जिद्द आणि कष्टामुळे आज मी हे करू शकले
76 वर्षांपूर्वी माझे पती एका भांड्याच्या कारखान्यात कामाला होते. मग ते दोन महिने आजारी पडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणी-भांडी करण्यापेक्षा मी हॉटेल चालवण्याचा निर्णय घेतला आणि एक दुकान भाड्याने घेतले. हळूहळू मी बनवत असलेली मिसळ सगळ्यांना आवडू लागली आणि त्यातून माझा व्यवसाय मोठा झाला. हॉटलेच्या उत्पन्नावर मी माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकले. आज माझी तीनही मुले सरकारी नोकरीत असून तिघांना मी घर करून दिले. मी माझी जबाबदारी पार पाडली, आज नातवंडे मोठी झाली. ह्या व्यवसायात मला मदत करत आहेत. सीताबाई मिसळ आता ब्रँड झाला असला तरी मला त्याचा गर्व नाही. मिसळ खाऊन ग्राहक समाधानी झाला ह्याचाच मला आनंद आहे, असे सीताबाई मोरे यांनी सांगितले.
आम्ही लहानपणापासून सीताबाई ह्यांच्या मिसळचे फॅन आहोत
सुरुवातीला जुने नाशिक भागात सीताबाई आजी यांचे लहानशे हॉटेल होते, तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे मिसळ खाण्यासाठी जातो. त्यांची मिसळ जास्त तिखट नसली तरी चटकदार आहे. आम्ही मित्र आठवड्यातून एकदा दोनदा तरी त्यांची मिसळ खाण्यासाठी येतो. सुरुवातीपासून त्यांच्या मिसळीच्या चवीत कुठलाही बदल झालेला नाही. त्यांची मिसळ खाल्यानंतर छातीत जळजळ अॅसिडिटीचा त्रास होत नाही. आज सीताबाई 93 वर्षांच्या असून सुध्दा स्वतः काम करतात, ह्याचे आम्हाला कौतुक वाटते, असे नाशिककर ग्राहक सांगतात.