नागपूर - देशातील बेरोजगारी वाढत असताना अग्निपथसारखी ( Agnipath ) चांगली योजना सरकारने आणली आहे. मात्र, तरुणांमध्ये गैरसमज झाला आहे, पण तरुणांनी शांतता राखायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Aathawale ) म्हणाले. ते अमरावती दौऱ्यावर असताना नागपूर ( Nagpur ) विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
भविष्यात बदल होतील - अग्निपथ योजनेत अनेक बदल पुढच्या काळात होणार आहे. या पद्धतीने अग्निविरांना नोकरीसाठी पर्याय खुले होणार आहे. काही कारणामुळे जरी गैरसमज झाला असला तरी वाढत्या बेरोजगारीची तोडगा म्हणून सरकारने ही योजना आणली आहे. संसदेत जेव्हा हा विषय चर्चेला जाईल. त्यात आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे. तरुणांसाठी ही फायद्याची योजना आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
विधान परिषदेत विजय भाजपाचाच - राज्यसभेत देवेंद्र फडणीस यांनी जादू करून पाचवी जागा निवडून आणली आहे. त्याच पद्धतीने विधान परिषदेमध्ये ही भाजपचा विजय होईल अशा पद्धतीची रणनीती तयार झाली आहे. तसेच अनेक छोट्या पक्षांचा पाठिंबा सुद्धा भाजपला मिळणार आहे. अनेक अपक्ष आमदार सुद्धा भाजपच्या पाठिशी राहणार आहेत. त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपचा विजय हमखास होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवला. आमचे सगळे उमेदवार निवडून आणायचे आहेत, असा आता संकल्प आहे. आमचे सगळेच उमेदवार निवडून येतील यात शंका नाही, असेही रामदास आठवले म्हणाले. महाविकास आघाडीला धक्का देण्याचे काम या निवडणुकीतही होणार आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना सल्ला - उद्धव ठाकरे यांना आमचा सल्ला हाच आहे की, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचे काम केले. 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवशक्ती आणि भीमशक्ती हे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडून त्यांनी भाजपसोबत आले पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली पाहिजे. आगामी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा तसेच आगामी विधानसभेच्याही जास्तीत जास्त जागा जिंकण्याची आमची रणनीती तयार झाली आहे. 2024 च्या निवडणुकीत 150 ते 160 जागा मिळतील अशी रणनीती आहे. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत राहणार असून 2024 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले.
हेही वाचा - VIDEO : पंतप्रधान मोदींनी स्वत: हाताने उचलला कचरा