नागपूर - नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावर उभं राहून लघुशंका करने एका तरुणाला चांगलंच महागात पडले आहे. लघुशंका करताना पाय घसरल्याने युवकाचा नाग नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. धंतोली परिसरात नाग नदीच्या काठावर शुभम हातमोडे हा तरुण लघुशंका करत होता. या भागातील नाग नदीची भिंत आधीच कोसळली आहे. हा तरुण नदीच्या काठावर उभा असताना अचानक काठावरील माती घसरल्याने शुभम नदीत पडला. रात्रभर झालेल्या पावसाने नदीच्या पाण्याला प्रवाह जोरात असल्याने शुभम वाहत्या पाण्यासोबत दूरपर्यंत वाहत गेला.
अग्निशमन पथकाकडून शोध सुरू : शुभम नाग नदीत पडल्याचे अनेकांच्या लक्षात आले. उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडा ओरड केली. मात्र शुभम तोपर्यंत वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. गायत्री मंदिर चौकात अग्निशमन विभागाने शुभमच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.