नागपूर - आंबटगोड आणि रसाळ चवीसाठी जगप्रसिद्ध असलेले नागपूरी संत्रे आणि संत्रा बर्फीचे नाव कुणाच्याही कानी पडताच तोंडाला पाणी सुटेल. या संत्र्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते. केवळ नागपूरच नाही तर अमरावती आणि शेजारच्या काही ( Orange production in Nagpur and Amravati areas ) भागात संत्र्यांचे भरघोस उत्पादन घेतले जाते. मात्र, दुर्दैवाने यासंत्र्यांवर प्रक्रिया करणारा ( Orange Processing Project ) एक सुद्धा मोठा प्रकल्प नागपूर आणि शेजारच्या अमरावती जिल्ह्यात नाहीत. केवळ हल्दीराम आणि हिरा स्वीटस् ( Haldiram and Hira Sweets ) सारख्या मोठ्या हॉटेल्सकडे संत्रा बर्फी तयार करण्याचे प्लांट आहेत. त्यामुळे नागपूरी संत्रा देशाच्या इतर भागात प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जात आहे.
नागपूर आणि अमरावती जिल्हा हा संत्र्यांच्या उत्पादनात अव्वल आहे. त्यामुळे या परिसराला संत्र्यांचा 'कॅलिफोर्निया' म्हणून ओळखले जाते. नागपूरचा संत्रा जगात भारी आल्याने त्याच्या चवीची सर्वांनाच भुरळ पडली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यासह काटोल, कळमेश्वर, सावनेर, हिंगणा तालुका संत्राच्या उत्पादनात अग्रेसर आहे. या भागात संत्र्याच्या शेकडो बागा दृष्टीस पडतात. मुख्यतः संत्राचे पिक मृग आणि अंबिया बहरात उत्पादन घेतले जाते. अस्मानी संकटाचा सामना केल्यानंतर पीक व्यवस्थित हाती आले तर सुलतानी संकट मात्र कायमच असते. संत्र्याला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात असावेत, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून शेतकऱ्यांची आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळच नाही.
प्रक्रिया प्रकल्प नांदेडला पळवला : संत्रा उत्पादकांना न्याय देण्याच्या घोषणा या वेळोवेळी राज्यकर्त्यांसोबतच विरोधकही करत असतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हिताची कृती कोणत्याही राजकारण्यांनी केलेली नाही. २०१४ साठी संत्रा प्रोसेसिंग युनिट लावण्याची घोषणा झाली, मात्र तो सुद्धा प्रकल्प नांदेडच्या नेत्यांनी पळवला. इथून संत्री नांदेडला नेणे शेतकऱ्यांना मुळीच परवडणारे नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात मोर्शी तालुक्यात संत्रा प्रकल्प उभारला जाणार, अशी घोषणा यावर्षी सुद्धा झाली आहे. परंतु आजवरच्या अनुभवातून बघता शेतकऱ्यांना यावर फारसा विश्वास नाही.
कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही : आशिया खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ म्हणून नरखेड तालुक्याची ओळख आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका हा संत्रा उत्पादकांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. नरखेड मध्ये ११ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे तर ५ हजार हेक्टरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, तालुक्यात कुठेच कोल्डस्टोरेज किंवा वेअर हाऊसची साधी सुविधा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात संत्री विकावी लागत आहेत.
संत्रा बर्फीची चव हरवते का?: ज्या प्रमाणात नागपूर, अमरावती जिल्हातील अनेक भागात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने सर्वांना आवडणारी संत्रा बर्फी सहज उपलब्ध होत नाही. नागपूरमध्ये हल्दीराम, हिरा स्वीटस मिळत असलेल्या संत्रा बर्फीला विशेष मागणी आहे. गेल्या दोन वर्षात आता मदर डेअरीकडून सुद्धा संत्रा बर्फीची विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र बर्फीचे दर फार अधिक असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. संत्रा बर्फी ही नाशवंत असल्याने ती फार काळ टिकू शकत नाही, त्यामुळे ती एक्सपोर्ट करताना विशेष काळजी घेतली जाते.
संत्रा प्रक्रिया उद्योग असते तर... : केवळ संत्रीच नाही तर संत्र्यांपासून तयार होणाऱ्या रसाला (ज्यूस) देखील जगात मोठी मागणी आहे. मात्र, संत्र्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. नागपूर अमरावतीला संत्रा प्रक्रिया उद्योग असते तर संत्रा फ्लेवर्स, पावडर, जॅम, जेली, बिस्कीट, केक, चॉकलेट्स, केक, गोड पदार्थ आदी उत्पादकांकडनही संत्र्याला मागणी वाढते आहे. एवढंच नाही तर संत्र्यांपासून बनविलेल्या विविध मिठाईंच्या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होतो. उन्हाळ्यात संत्रा स्क्वॅश'ला देखील चांगली मागणी असते.