नागपूर - एका भाजी विक्रेत्याने आपले उधारीचे पैसे परत न दिल्याच्या वादातून गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील बेसा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच मृत व आरोपींमधे वाद झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याची पोलिसांची माहिती आहे. उमेश ढोबळे असे मृताचे नाव आहे.
तब्बल ६ लाखांची उधारी
मृत उमेशने भाजी व्यवसायासाठी मित्राकडून ६ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र, उमेश ही रक्कम आरोपी सईद हसन आणि सईद टिमकीला परत देण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता. घटनेच्या काही तासांपूर्वीही आरोपींचा मृतासोबत पैशाच्या बाबतीत वाद झाला होता. तेव्हा देखील उमेशने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेले आरोपी बेसा पावर हाऊसवर पोहोचले आणि मृतावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी सईद हसन आणि सईद टिमकी या दोघांना सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - धारदार शस्त्रांनी वार करून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरू
दारू पिण्याच्या वादातून गुंडाचा खून -
नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कपिलनगर भागात दारू पिताना उद्भवलेल्या वादातून एका गुंडाचा खून झाला होता. शैलेश ऊर्फ वांग्या देशभ्रतार याच्या खून प्रकरणात त्याचा मित्र राकेश पटेल याला पोलिसांनी अटक केली होती. महत्वाचे म्हणजे, शैलेशवर शहरात अनेक गुन्हे नोंद होते. शैलेश गेल्या काही दिवसांपासून राकेशला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यातच उद्भवलेल्या वादातून राकेशने शैलेशचा खून केला असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा - पोलिसांच्या ताब्यातून ट्रक चोरणाऱ्या चोरट्याला अटक