नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( Rashtriya Swayamsevak Sangh ) संविधान विरोधी काम करते असा आरोप करत भारत मुक्ती मोर्चा ( Bharat Mukti Morcha ) संघटनेचे प्रमुख वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात आज बेझनबाग ते संघ मुख्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यानंतर आंदोलक संघ मुख्यालयाला घेराव घालणार होते. मात्र, शहर पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नाकारल्याने आंदोलन न्यायालयात गेले होते. न्यायालयाने देखील भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलन किंवा मोर्चा काढण्याची परवानगी नाकारत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे परवानगी करिता अर्ज करावा असे निर्देश दिले होते. तरी देखील वामन मेश्राम आणि त्यांची संघटना मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे आज नागपूर शहरातील संपूर्ण इंदुरा भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी वामन मेश्राम यांना ताब्यात (Vaman Meshram was detained in nagpur ) घेतले. बेझनबाग भागातून हा मोर्चा निघणार होता त्या ठिकाणी सुमारे 500 ते 600 पोलिसांचा मोठा फौज फाटा पोलिसांनी तैनात केला आहे.
का नाकारली होती परवानगी : शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असल्याने पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर न्यायालयाने देखील वामन मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करावा असे निर्देश दिले होते. तरी देखील वामन मेश्राम आणि त्यांची संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इंदोरा परिसरात कलम 144 लागू केली आहे
कार्यकर्त्यांची धरपकड सुरू : शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने नागपूर शहर पोलिसांनी दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. दिवसभरात आणखी आंदोलक ताब्यात घेतले जाणार आहेत.
आपले म्हणणे कायदेशीर मार्गाने मांडावे : भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळील बडकस चौकात मोर्चा काढण्याचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला होता. पोलीस विभागाने आणि न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर देखील सोशल मीडियाच्या पोस्ट वरून मोर्चेकरी संघ कार्यालयाजवळ जाण्याचा अंदाज येत होता अशी माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने त्यांची याचिका खारीज करत 6 तारखेऐवजी 8 तारखेनंतर सभा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीही आज ते मोर्चा काढणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं कायद्याच्या अनुषंगाने बेझनबाग आणि इंदोरा परिसरात 144 कलम लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. शहरात त्यांनी जमाव करू नये, अन्यथा पोलीस कायदेशीर कारवाई करेल. पोलीस अशा लोकांना ताब्यात घेईल असा इशारा देण्यात आला आहे. कुणीही कायद्याचे भंग करू नये, प्रक्षोभक भाषणे ऐकून नागरिकांनी भडकू नये, आपले म्हणणे कायदेशीर मार्गाने मांडावे असे आवाहन त्यांनी केले आहे.